नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जाते आणि रक्ताला कोणताही जात – धर्म नसतो. कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणने नेमका हाच संदेश दिला. या रक्तदान शिबिरात तब्बल 275 जणांनी रक्तदान केले.
कोणत्याही रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज भासते. त्यावेळी त्याला रक्त चढवताना ते कोणत्या जातीचे किंवा कोणत्या धर्माचे रक्त आहे हे बघितले जात नाही. तर त्याचा केवळ रक्तगट तपासून गरजू व्यक्तीला ते चढवले जाते. जात आणि धर्म या सर्वांपेक्षा आपण सर्व जण भारतीय आहोत हे महत्वाचे आहे. याच संकल्पनेतून आणि हाच एकतेचा उद्देश देण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे हे रक्तदान शिबीर घेण्यात आल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.
कल्याण पश्चिमेच्या स्प्रिंगटाइम क्लब सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल 275 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ज्यामध्ये सामान्य रिक्षाचालकांपासून ते बड्या उद्योजकापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश होता. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी जमा झालेले रक्त अर्पण आणि संकल्प रक्तपेढीत जमा करण्यात आले. या दोन्ही रक्तपेढीतून थॅलिसीमियाग्रस्त मुलांना मोफत हे रक्त देण्यात येते.
यावेळी इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव डॉ. ईशा पानसरे, खजिनदार डॉ. सुरेखा इटकर यांच्यासह डॉ. अश्विन कक्कर, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. राजेश राघवराजू, डॉ. हिमांशू ठक्कर, डॉ. सोनाली पाटील आदी टीमने विशेष मेहनत घेतली.