उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक ग्राहकाविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ग्राहकाने मीटर बायपास करून एक लाख 69 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळले होते.
लोटन नामदेव अहिरे (कॅम्प-एक, विनायक प्लास्टिक सिलिंग, स्वामी चाळसमोर, उल्हासनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहायक अभियंता मनीष मेश्राम व त्यांच्या पथकाने 8 ऑक्टोबरला विनायक प्लास्टिकच्या वीजजोडणीची तपासणी केली. ग्राहकाच्या वीज वापराची नोंद मीटरमध्ये होत नसल्याचे तपासणीत आढळले. अधिक तपासणी केली असता कारखान्याच्या छतावर मीटरकडे येणाऱ्या केबलला दुसरी केबल जोडून त्यामार्फत वीजवापर सुरु असल्याचे निदर्शनास आले. सहायक अभियंता मेश्राम यांच्या फिर्यादीवरून लोटन अहिरे विरुद्ध 1 लाख 69 हजार 580 रुपयांची 17 हजार 672 युनिट वीजचोरी केल्याचा गुन्हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.अंबरनाथ पश्चिमेतील घरगुती ग्राहक अली सैय्यद एन्टरप्रायजेस (वीज वापरकर्ता – वसीम युसूफ शेख, 301, अल्मास अपार्टमेंट, वुलन चाळ) याने मीटरमध्ये फेरफार करून 49 हजार 410 रुपये किंमतीची 2 हजार 487 युनिट वीजचोरी केल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळले होते. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.