महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण परिमंडलात वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण परिमंडलात 7 ते 9 आक्टोबर या सलग तीन दिवसात वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम राबवून 4 हजार 659 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 401 ठिकाणी विविध हातखंडे वापरून वीजचोरी होत असल्याचे आणि 118 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळला. संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय 220 ठिकाणी वीज वापराची अचूक नोंद मीटरमध्ये होत नसल्याचे आढळून आले. या मोहीमेत 83 संशयित वीजमीटर बदलण्यात आले.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली 200 महिला कर्मचारी, 214 सुरक्षारक्षक यांच्यासह 978 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या 225 विशेष पथकांकडून ही धडक मोहीम राबवण्यात आली. तर या मोहीमेसाठी 32 पोलिस कर्मचाऱ्यांची मदतही घेण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वीज जोडण्यांपैकी 8.6 टक्के जोडण्यांमध्ये मीटरशी छेडछाड अथवा थेट मीटर बायपास करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित 401 ग्राहकांवर वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार कारवाई सुरू आहे. तर अनधिकृत वीजवापर आढळलेल्या 118 जणांवर कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील सोनारपाडा, नांदिवली, काळेगाव, सांडप, काटेमानवली, कटाई, पारनाका, अन्सारी चौक, गोविंदवाडा, शिवाजी चौक भागात 50 पथकांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईत 94 ठिकाणी 1 लाख 74 हजार युनिटची वीजचोरी व 19 ठिकाणी 10 हजार 400 युनिट विजेचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला. कल्याण ग्रामीण आणि उल्हासनगर एक व दोन विभागातील टिटवाळा, शहापूर, व्हिनस चौक, 30 सेक्शन, गायकवाड पाडा, तानाजी नगर, वूलन चाळ, खुंटवली आदी भागात 92 पथकांनी केलेल्या कारवाईत 123 ठिकाणी वीजचोरी व 11 ठिकाणी अनधिकृत वीजवापर आढळून आला.

वसई आणि विरार विभागात विठ्ठल मंदिर, पेल्हार, नवजीवन, एव्हरशाइन नगरी, सहकारनगर, मानवेलपाडा आदी भागात 58 पथकांनी 87 ठिकाणी 1 लाख 37 हजार युनिट वीजेची चोरी (सुमारे 19 लाख रुपये) व 57 हजार 600 युनिट विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला. पालघर विभागातील मनोर व विक्रमगड भागात 25 पथकांनी वीजचोरीच्या 97 व अनधिकृत वीज वापराच्या 35 जोडण्यांवर कारवाई केली.वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. कल्याण परिमंडलात वीज चोरीविरुद्धच्या मोहिमेत सातत्य ठेवण्यात येणार असून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×