मुरबाड/प्रतिनिधी – कोविड काळातील दीर्घ मुदतीच्या कालखंडानंतर शासकीय आदेशानुसार दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय झाला व पुन्हा एकदा चिमुकल्याच्या उत्साही पावलांनी शाळांचा परिसर गजबजून चैतन्यदायी दिसून आला.
ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा वेळूक मध्ये देखील इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग आज भरवण्यात आले शाळा स्वच्छता ,शाळा निर्जंतुकीकरण ,शालेय परिसरात रांगोळ्या काढून शाळा परिसर सुशोभित करण्यात आला. शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकाचे गुरुजनांच्या वतीने शाळेच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायजर देऊन प्रवेश देण्यात आले. तसेच गुलाबपुष्प ,खाऊ व मास्क देऊन स्वागत करण्यात आले. आनंददायी स्वागतामुळे विदयार्थी आनंदी दिसत होते. यावेळी मुरबाड पंचायत समितीच्या वरिष्ठ शिक्षण अधिकारी कल्पना खरपडे यांनी याप्रसंगी शाळेस भेट दिली. व एकंदरीत शाळा स्वच्छता व शाळा प्रवेश कार्यक्रमाचे कौतुक केले. व विद्यार्थी यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कोविड काळात कोणती दक्षता घ्यावी तसेच स्वच्छता विषयक बाबीवर मार्गदर्शन केले.
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक विजयकुमार जाधव सहशिक्षक अतुल वाबळे,आनंद खवणेकर व गायत्री जोशी यांनी केले.