कल्याण/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची, पिडीत तरुणी आणि तिच्या आई वडिलांची भेट घेतली. या भेटी नंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोऱ्हे यांनी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात चार्जशिट लवकर दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत सूचना पोलिसांना दिल्या. तसेच कव्हीक्शन रेट जास्त असलेल्या सरकारी वकिलाची नेमणूक करा, मात्र या खटल्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे यामुळेच कनव्हीक्शन रेट चांगला असलेला सरकारी वकील देण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार विश्वनाथ भोईर, महिला जिल्हा संघटक विजया पोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनी फार थोडय़ा काळात आरोपीना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पिडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल. त्यासाठी तिच्या पालकांशी बोलणे झाले आहे. तिच्या कुटुंबाला मदत केली आहे. तिचे वडील या प्रकरणामुळे रोजगारावर जाऊ शकत नाही. त्याना बाकीची कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. पोलिस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पिडीत कुटुंबाला येत्या पंधरा दिवसात मदत दिली जाईल अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली आहे.
डोंबिवली प्रकरणातील मुलीच्या आई वडिलांनी मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. मात्र काही तासात मुलगी परत आली होती. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही असे पालकांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर वर्षभरात हरविलेल्या, अपहरण झालेल्या किंवा गायब झालेल्या मुली जर परत आल्या असतील तर या मुली सुरक्षित आहेत ना? त्याची माहिती सामाजिक संघटनाच्या माध्यमातून घेत या मुली अडचणीत असतील तर महिला दक्षता समितीने इतर काही गटांना जोडून घेत या मुलीना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना नीलम गोऱ्हे यांनी पोलिसाना दिल्या आहेत. तरुणां मध्ये कायद्याच्या जनजागृतीची आवश्यकता आहे, सगळंच काम पोलीस करू शकत नाही नागरिकांनी देखील आशा घटना घडू नये यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.