मुंबई /प्रतिनिधी – भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० खाटांचे जिल्हा दर्जाचे रुग्णालयाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच मनपा क्षेत्रात जास्तीत जास्त आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त यांची मुंबई येथील आरोग्य भवन येथे सोमवारी भेट घेतली. यावेळी आमदार शेख यांनी भिवंडीतील आरोग्य सेवा सुविधा लवकरात लवकर सुधारण्यासाठी राज्य आरोग्य सेवा यंत्रणेने लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी मागणी केली.
आमदार रईस शेख यांनी राज्याचेआरोग्य सेवा आयुक्त यांच्याकडे इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० खाटांचे जिल्हा दर्जाचे रुग्णालयाच्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भिवंडी शहरामध्ये २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्र उभारावे , भिवंडीत कॉलेज ऑफ फिजीशीयन्स अँड सर्जन्स यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण विषयक निरनिराळे डिप्लोमा कोर्सेस सुरू करावेत , महानगरपालिका क्षेत्रामधील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयामध्ये युनानी बाह्यरुग्ण विभाग सुरु करावे, १०८ क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका सेवा ठाणे पर्यंतच मर्यादित न ठेवता मुंबई शहरापर्यंत सुरु करण्यात यावे, स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे जेनेरिक मेडिकल स्टोर्स सुरु करावे , शहरात मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध करावे , शांतीनगर व नवी वस्ती येथे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, स्व- इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयांतर्गत दिव्यांग, अपंगाना प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, स्व- इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयमध्ये शासकीय व्यसनमुक्ती केंद्र व शव वाहिनी विनामुल्य उपलब्ध करण्यात यावी , या रुग्णालयात बर्न वार्ड सुरु करण्यात यावे, स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे इमारत दुरुस्ती व विस्तारीकरणासाठी डी.पी.डी.सी. मार्फत सन २०२१-२२ अंतर्गत १० कोटीरूपायांची रु.१० करोड निधीची तरतूद करावी तसेच रुग्णालयात डेन्टल यंत्रणा व सामुग्री उपलब्ध करणे तसेच डेन्टल वॅन सेवा सुरु करण्यात यावर्षी मागणी आमदार शेख यानी या बैठकीप्रसंगी केली
त्यावेळी लवकरात लवकर शक्य तितक्या सेवा सुविधा रुग्णालयात तत्काळ करण्यात येतील असे आश्वासन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामा स्वामी व संचालिका डॉ. साधना तायडे यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामा स्वामी, संचालिका डॉ. साधना तायडे, उपसंचालक डॉ. अंबाडेकर , सिव्हील सर्जन डॉ. कैलास पवार, भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ राजेश मोरे व मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ खरात हे उपस्थित होते.