कल्याण/प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण डोंबिवलीत आयोजित ‘जन आशिर्वाद यात्रे’च्या माध्यमातून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप कल्याण जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
सोमवारी 16 ऑगस्ट रोजी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि 18 ऑगस्ट रोजी कल्याण पश्चिमेला भाजपतर्फे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स आदी कोवीड नियमांचे सर्रासपणे उल्लंघन झालेले पाहायला मिळाले. तसेच यावरून राजकीय व्यक्तींना एक न्याय आणि सर्वसामान्यांना एक अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर दुपार नंतर कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी अखेर कल्याणात खडकपाडा, महात्मा फुले चौक आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मोरेश्वर भोईर, संजय तिवारी, नंदू परब यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर
कल्याणात खडकपाडा आणि महात्मा फुले चौक या दोन्ही पोलीस ठाण्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष यांच्यासह 10 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- August 19, 2021