डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची साफसफाई व स्वच्छता पालिका प्रशासनाकडून केली जात नाही.वारंवार पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे लक्ष दिले नाही असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्रदिनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर कचरा फेको आंदोलन केले.यावेळी सुरक्षा रक्षकांनी आंदोलनकर्त्यांना कार्यालयाच्या आवारात आत येण्यास मज्जाव केला.
डोंबिवली स्टेशनजवळील इंदिरा चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी महापौर,पालिका आयुक्त यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी व इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या गाजावाजा कार्यक्रम पार पडल्यावर काही दिवसांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही अस आरोप वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी पत्रकारांनी बोलताना केला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याची साफसफाईकडे पालिकेने कानाडोळा केला. यामुळे नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष ठोके यांनी स्वांतत्र्यदिनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर कचरा फेको आंदोलन केले.यानंतर तरी पालिकेला जाग येईल असे ठोके यांनी सांगितले.पालिकेने साफसफाई ठेवण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.