सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली – कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कनेडी परिसरातील गावांचा कणकवली शहराशी संपर्क तुटला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
वागदे येथे राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाघोटन नदीने इशारापातळी ओलांडल्यामुळे खारेपाटण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गड नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे कणकवली येथील गोपुरी आश्रमाजवळील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील जामदा पूल पूर्णपणे बुडाला असून गुरववाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच नदीकाठची भात शेती वाहून गेली आहे.
दोडामार्ग तालुक्यात भेडशी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच घोडगेवाडी – केर, परमे – भेडशी, उसप – खोक्रल, खोक्रल – मांगेली या मार्गांवरही पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. आंबेरी पुलावर अजूनही पाणी असून वाहतूक बंद आहे. कणकवली रस्ता (श्रावण नदीवाडी) पाण्यामुळे वाहतूक बंद आहे.पियाळी नदीच्या पुलावरील पाणी कमी झालेले असून वाहतूक सुरू झालेली आहे.