कल्याण प्रतिनिधी – टिटवाळ्यातील काळू नदीलगत सापासारखा जीव सोमवारी रात्रीच्या सुमारास रोड क्रॉस करताना नागरिकांना आढळून आला. त्याच्या पाठीवर जखम झाली होती त्याला कोणीतरी दगड मारून जखमी केल्याचा अंदाज होता. स्थानिक नागरिकांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर फोन करून याची माहीती दिली तेव्हा टिटवाळा टिमचे सर्पमित्र धनुष वेखंडे व सुमित भडांगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर जीव सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. प्रथमदर्शनी हा मांडूळ असल्याचा भास झाला परंतू कल्याण येथील वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे संपर्क साधला व ओळख निश्चित करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. वरद गिरी, सरिसृप संशोधक यांची मदत मिळाली.
या जीवाला शास्त्रीय भाषेत इंग्लिश मध्ये बॉम्बे सिसिलिअन व मराठीत देवगांडूळ असे म्हणतात. हा उभयचर असून पाणि व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहतो याचे मुख्य अन्न गांडूळ आहे तसेच स्वः संरक्षणासाठी स्वतःच्या शरीरावर चिकट स्त्राव सोडतो त्यामुळे त्याचे शरीर खुप गुळगुळीत होते म्हणूनच त्याला शिकारीकडून सहज पकडणे सहज शक्य होत नाही. हा जीव प्रमुख्याने पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. टाचणी च्या आकाराचे सहज न दिसणारे डोळे व गोलाकार रिंगण असलेले शरीर यावरून त्याची ओळख निश्चित करता येते. अशा जीवाला वाचविण्यात वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या टिमला यश आले आहे.
हा सिसिलिअन उभयचर जीवाला वनविभागाच्या परवानगीने कल्याण येथील खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोले यांनी प्रथमोपचार केला असून तज्ञव्यक्ती व वनविभागाच्या परवानगीने शास्त्रीय नोंदी घेऊन त्याला निर्सगमुक्त करण्यात येईल अशी माहिती वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार (वन्यजीव अभ्यासक) यांनी दिली.
कल्याण डोंबिवली व टिटवाळ्यातील जैवविविधतेचा परिपूर्ण अभ्यास करून असून वन्यजीव व इतर जीवाची नोंद करणे अत्यावश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य व कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेत जैवविविधता नोंद वही असून त्यात या उभयचर वर्गातील सिसिलिअन (देवगांडूळ) याची नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगीतले.