डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच या स्वातंत्र्याचे जे साक्षीदार आहेत त्या नागरिकांना डोंबिवली येथील नाहर रुग्णालयात पुढील ७५ दिवस मोफत बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापक तथा मनसे शहर सचिव अरुण जांभळे तथा नाहर मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाचे संचालक तथा मनसे दिवा विभाग अध्यक्ष दिनेश पाटील यांनी स्वातंत्रदिनी दिली.भारताला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने ज्या नागरिकांचे वय ७५ वर्ष आहे,अशा स्वातंत्र्याच्या साक्षीदारांना रुग्णालयात पुढील ७५ दिवस उपचारासाठी मोफत बेड देण्यात येतील.
तसेच अर्यपॅथोलॉजी तर्फे देखील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी ७५ टक्के रक्कम कमी करण्यात येत असल्याने त्यांचेही आभार व्यक्त करत असल्याचे व्यवस्थापक जांभळे यांनी सांगितले. याआधी देखील अशाच प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वयोमानानुसार येणाऱ्या नागरिकांकडून बेडची रक्कम केवळ ५३ रुपये आकारली होती. कोविड काळात देखील अनेक गरजूंना या रुग्णालया तर्फे मोफत रुग्णसेवा देण्यात आली होती. सध्या रुग्णालयाच्या वतीने अनेक गावात फिरता दवाखाना सुरू आहे. पुर आलेल्या महाड, चिपळूण, पोलादपूर या गावांमध्ये देखील नाहर रुग्णालयातर्फे फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली होती. नाहर रुग्णालयात १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.