नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
गोंदिया/प्रतिनिधी – ‘राइस सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्हाची खास ओळख आहे. पण सध्या गोंदियात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. गुन्हेगारांच्या मनातील पोलिस प्रशासना विषयी असलेली भीती कमी झाली आहे. कारण भर चौकात एका व्यक्तीवर अमानुशपणे गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे गोंदिया शहरात दहशत माजलेली. पोलिसांनी आरोपींना शोधण्यात आपली पूर्ण ताकत पणाला लावली. गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 24 तासात पोलिसांनी 7 आरोपींना अटक केल्याचा खुलासा गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. जुन्या वादातून आणि पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलीस उपअधीक्षक रोहिणी बनकर यांनी सांगितले.
मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिरमार्गे कुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात होता. त्यादरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी रोहितवर गोळीबार केला. या घटणेनंतर रुग्णालयात रोहितवर उपचार सुरू होते. पण शरीरातून जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रोहितचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत रोहित तिवारी हा 2012 च्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून, तो जामिनावर बाहेर होता. त्याच खुणाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी मोहित मराठे (36), राजेंद्र उर्फ बंटी दवणे (42), हिरो शंकर दवणे (37), शिवानंद उर्फ सुजल भेलावे, विनायक नेवरे (21), रितेश उर्फ सोंटू खोब्रागडे, सतीश सेन (23) हे आहेत. यापैकी पोलीस पथकाने बंटी दावणे आणि हिरो दावणे यांना गोंदिया येथून अटक केली. तर उर्वरित आरोपींना देवरी येथून अटक केली. या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.