नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली– अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 10.05.2022 रोजी हवाई मार्गाने दाखल झालेल्या मालाच्या वाहतुकीला थांबवत अंमली पदार्थांच्या तस्करीची आणखी एक नवीन पद्धत उघडकीला आणली आणि 62 किलो हेरॉईन जप्त केले. भारतातील कुरियर/मालवाहू जहाज /विमान प्रवाशांच्या माध्यमातून तस्करी केलेल्या हेरॉईनच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तीपैकी एक आहे.
“ब्लॅक अँड व्हाईट” हे सांकेतिक नाव असलेल्या ऑपरेशन अंतर्गत, महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली. या अंतर्गत ”ट्रॉली बॅग” असल्याचे घोषित करण्यात आलेल्या आयात मालाच्या खेपेतून 55 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. युगांडातील एंटेबे येथून निघालेला हा आक्षेपार्ह माल दुबईमार्गे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक संकुलात आला होता.पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये अतिशय त्वरेने केलेल्या कारवाईमुळे आणखी 7 किलो हेरॉईन आणि 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या 62 किलो हेरॉईनची अवैध बाजारातील किंमत 434 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
आयात मालामध्ये 330 ट्रॉली बॅग्स होत्या, जप्त केलेले हेरॉईन 126 ट्रॉली बॅग्सच्या धातूच्या पोकळ नळ्यांमध्ये अतिशय चलाखीने लपवल्याचे आढळून आले. लपवलेले हेरॉईन शोधणे अत्यंत कठीण होते.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह मालाची खेप आयात करणाऱ्या आयातदाराला ताब्यात घेतले आहे. इतर संशयितांचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.