नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – परराज्यातून मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे,अग्निशस्त्र बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या ६ जणांना जेरबंद करण्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपी हे अग्निशस्त्रासह जबरीचा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. परंतु दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून सर्व दिल्ली येथील आहेत.
दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटला माहिती मिळाली होती की, बोरिवली येथील एलोरा गेस्टहाऊसजवळ परराज्यातील ६ इसम गेल्या २ दिवसांपासून वास्तव्यास असून त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. हे इसम शस्त्रधारी होते, मुंबईतील काही ठिकाणांची रेकी करुन दरोडा टाकण्याच्या तयारीत ते होते. आरोपींकडे शस्त्र असल्याची पुरेसी काळजी घेऊन हे इसम निघण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
शहादत हुसैन रा. दिल्ली, असलम खान रा. दिल्ली, नदीम अन्सारी रा. नवी दिल्ली, रिझवान लतीफ रा. उत्तर प्रदेश, नौशाद अन्वर रा. उत्तर प्रदेश, आदिल खान रा. उत्तर प्रदेश, अशा ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपीतांकडून एक गावठी कट्टा, एक देशी पिस्टल, एक विदेशी पिस्टल, २९ काडतुसं, ४ मॅगझीन आणि चाकू तसेच स्कॉर्पिओ गाडी आणि दरोड्याचे साहित्य जप्त कऱण्यात आले आहे. तर दरोडा टाकण्याची तयारी कऱणे आणि त्याकरिता अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे पुढील तपास करत आहे.