नेशन न्यूज मराठी टीम.
हरियाणा/प्रतिनिधी – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा समाज कल्याण विभागाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन नुकतेच संत निरंकारी अध्यात्मिक स्थळ समालखा येथे केले होते. ज्यामध्ये एकूण 54 जोडपी विवाहबद्ध झाली. सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दाम्पत्यांना आपले पावन आशीर्वाद प्रदान केले, तसेच त्यांच्या सुखी जीवनासाठी मंगलमय प्रार्थना केली. या शुभ प्रसंगी संत निरंकारी मिशनचे हजारो भाविक भक्त, वर-वधू, त्यांचे आई-वडील व नातेवाईक उपस्थित होते.
साध्या पण प्रभावशाली पद्धतीने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक जयमाला (पुष्पहार) आणि निरंकारी पद्धतीच्या विवाहाचे वैशिष्ट्य असलेले सामायिक हार (सांझा हार) प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात मिशनच्या प्रतिनिधींकडून घालण्यात आले. निरंकारी लावांच्या (मंगलाष्टका) वेळी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी वधूवरांवर पुष्पवर्षाव करत आपले दिव्य आशीर्वाद प्रदान केले. त्यासोबतच उपस्थित भाविक भक्तगणांनी आणि वर-वधूंच्या परिवारांनीदेखील वधूवरांवर पुष्पवर्षाव केला. निश्चितच हे एक विलोभनीय दृश्य होते.
संत निरंकारी मिशनचे तृतीय गुरू बाबा गुरुबचनसिंहजी यांनी समाज कल्याण व सामाजिक सुधारणांच्या अंतर्गत साधे विवाह करण्यावर विशेष भर दिला. दिखाऊपणाच्या अवडंबरापायी वायफळ खर्च करण्यात संकोच केला जावा हाच त्यांचा उद्देश होता. त्यांच्या याच लोककल्याणकारी भावना पुढे घेऊन जाण्यासाठी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सर्व भक्तगणांना मार्गदर्शन करीत आहेत.
आजच्या या शुभ प्रसंगी भारताच्या विविध राज्यांतील एकूण 54 विवाहेच्छुक जोडपी सहभागी झाली होती, त्यामध्ये प्रामुख्याने आसाम, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तराखंड व पश्चिम बंगाल येथील जोडप्यांचा समावेश आहे. सामूहिक विवाहानंतर सर्वांसाठी भोजनाची योग्य व्यवस्था निरंकारी मिशन द्वारे केली होती.
नवविवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की, मिशनची शिकवणूक धारण करुन आपल्या जीवनात दिव्य गुणांचा अंगीकार करावा आणि गृहस्थ जीवन प्रेमपूर्वक जगावे. घर परिवारामधील आपली कर्तव्ये निभावून सर्वांचा आदर सत्कार करावा आणि मिशनच्या सिद्धांतांना स्वीकारून सर्वांबरोबर आपुलकीने व एकोप्याने राहावे.