नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – देशात आर्थिक फसवणुकीच्या घटनेचे प्रमाण वाढत दिसत आहेत. या डिजिटल युगात गुन्हेगार फसवणुकीचे रोज नवीन प्रकार शोधून काढत आहे. अशातच नवी मुंबईतील वृद्ध जोडप्यासोबत 32 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नेरूळ भागात राहणाऱ्या एका सेवा निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीसोबत ही फसवणूक करण्यात आल्याची तक्रार सायबर सेल नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाली.
आरोपी भामट्यांनी 82 वर्षीय सेवा निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला फोन करून आम्ही बीएसएनएल मधून बोलत असून आपल्या आधार कार्डचा चुकीचा वापर झाल्याचे खोटे सांगितले. तसेच पुलवामा आणि इतर देशद्रोही कृत्यात हात असल्याचे सांगून गुन्हा दाखल झाला असून आपली चौकशी केली जाईल. या चौकशीला सामोरे जातात रिझर्व बँकेत तुम्हाला काही पैसे डिपॉझिट करावे लागतील जे तुमची चौकशी संपली की परत मिळतील असे सांगितले. वृद्ध पती-पत्नीने भीतीपोटी आरोपींना पैसे पाठविले. आरोपींनी वृद्ध जोडप्याकडून चार वेळेत एकूण 32 लाख रुपये उकळले. या घटनेनंतर वृद्ध जोडप्याला संशय आल्याने त्यांनी सायबर सेल पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे.