नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक खनिकर्म काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय समितीने ‘भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेने शाश्वत खनिकर्म ” या संकल्पनेतून पहिल्या राष्ट्रीय कोळसा परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे 16 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी केले आहे.
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या परिषदेला संबोधित करणार आहेत.दोन दिवस चालणारी ही परिषद धोरणकर्ते, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील खाण कंपन्या, संशोधक, शिक्षणतज्ञ आणि इतर भागधारकांना संवाद साधण्यासाठी आणि भारतीय कोळसा क्षेत्राला आत्मनिर्भर भारतच्या राष्ट्रीय अभियानाशी संरेखित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक आराखडा तयार करण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करेल.ऊर्जा क्षेत्रातील इंधन स्वयंपूर्णता, कोळसा आणि तंत्रज्ञान आणि शाश्वततेसाठी पोलाद निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता या तीन प्रमुख विषयांवर या परिषदेमध्ये प्रामुख्याने चर्चा होईल.
कोळसा, खाण, उर्जा, पोलाद, निती आयोग, आपत्ती व्यवस्थापन, कोळसा खाण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां व्यतिरिक्त खाण अभियांत्रिकी क्षेत्रातील सुमारे 150 विद्यार्थी या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनात कोळसा खाण क्षेत्रातील तंत्रज्ञान, शाश्वत विकास, माहिती तंत्रज्ञान उपक्रम, खाण सुरक्षेतील सर्वोत्तम पद्धती इत्यादींसंदर्भातील कोळसा खाण क्षेत्रातील उपक्रम प्रदर्शित केले जातील. .भारतीय कोळसा खाण क्षेत्राद्वारे वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान -आधारित साधने देखील या प्रदर्शनात असतील.