नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
ठाणे/प्रतिनिधी– महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवार, दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वा. ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार , जगदीश खैरालिया, अभय कांता यांनी दिली आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरांवर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जोतिबा फुले आयुष्यभर झटले.
जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला.आज त्या सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणे गरजेचे आहे, या विचाराने प्रेरित होऊन ठाणे शहर व जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने ‘”सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे” स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने भगवती मैदान (विष्णूनगर, नौपाडा) ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यान (गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ)पर्यंत दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर असणार आहेत आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणार्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतीशील पाठिंबा दर्शविला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उबाठा) , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष (ऐक्यवादी) , स्वराज इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी सक्रीय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.या दिंडीमध्ये महात्मा फुले यांचा विचार मानणाऱ्या ठाणे शहर व जिल्ह्यांतील सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस निर्मला पवार, संजय भालेराव आदी उपस्थित होते.