नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात प्रकरणांसाठी विशेष लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष लोकअदालतीमध्ये वकील संघटना, पक्षकार, विधीज्ञ, इन्शुरन्स कंपन्या यांनी प्रतिसाद दिला व १३० प्रलंबित मोटार अपघात दावे निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार किमान समान कार्यक्रम-२०२३ अंतर्गत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत ठाणे न्यायालयामध्ये मोटार अपघात दावे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, ८ जुलै, २०२३ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायायालयात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण १३० प्रकरणांत तडजोड होवुन पिडीतांना रक्कम १०,७९,४५,०००/- रु. भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यात मोटार अपघात दावा क्र. ५४९/२०२१ मध्ये चोलामंडलम जनरल इन्श्युरन्स कंपनीतर्फे उच्चतम रक्कम रूपये ६३,००,०००/- एवढी रक्कम पिडीतांस मंजुर करण्यात आली.
मोटार अपघात दावा क्र. २०/२०२३ मध्ये गो डिजिट इन्श्युरन्स कंपनीतर्फे ५०,००,०००/- एवढी रक्कम व मोटार अपघात दावा क्र. ३८३/२०२० मध्ये रॉयल सुंदरम जनरल इन्श्युरन्स कंपनीतर्फे ४२,००,०००/- एवढी रक्कम मंजुर करण्यात आली.ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये मयत व्यक्तीचे वारसांना जास्तीत जास्त मोटार अपघात नुकसान भरपाई मंजूरीकरीता मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य एस. एन. शाह यांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले. तसेच ठाणे जिल्हा वकील संघटना व विशेषत: मोटार अपघात प्राधिकरणात काम करणारे विधीज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या विशेष लोकअदालतीमध्ये एकूण ४८ प्रकरणांत तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी पध्दतीने तडजोड करण्यात आली व त्यामुळे परजिल्हा व परराज्यात असलेल्या पक्षकारांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरणात तडजोड कामी सहभाग घेता आला व त्यामुळे वेळ व पैशाची बचत झाली. तसेच इतर अशाच मोटार अपघात दाव्यांमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये विशेष लोकअदालतीद्वारे तडजोडी अंती समेट घडवून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले गेले, अशी माहिती सचिव श्री. सुर्यवंशी यांनी दिली.