नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1243.46 टन मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 1297.38 टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी अंदाजे 53.92 टन इतकी जास्त मालवाहतूक केली आहे. भारतीय रेल्वेने यावर्षी 1,40,623.4 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 1,35,388.1 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षी रेल्वेच्या उत्पन्नात सुमारे 5235.30 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेने जानेवारी 2024 या महिन्यात वाहतूक सुरु करण्याच्या स्थानकापासून 142.70 टन मालवाहतूक केली तर जानेवारी 2023 मध्ये 134.07 टन इतकी मालवाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी अंदाजे 6.43% वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी 2024 मध्ये मालवाहतुकी द्वारे रेल्वेला15514.82 कोटी रुपये इतका महसूल मिळालेला आहे. जानेवारी 2023 मध्ये रेल्वेला 14908.82 कोटी रुपये महसूल मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेला यावर्षी मिळालेल्या महसुलात 4.06 % इतकी सुधारणा झाली आहे.
जानेवारी 2024 मध्ये भारतीय रेल्वेने 71.45 टन कोळसा, 17.01 टन लोह खनिज, 6.07 टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 7.89 टन सिमेंट (क्लिंकर वगळता), 5.52 टन क्लिंकर, 4.53 टन अन्नधान्य, 5.27 टन खते, 4.31 टन खनिज तेल, कंटेनरच्या स्वरुपातील 6.98 टन, आणि 10.20 टन उर्वरित वस्तूंच्या स्वरूपातील मालवाहतूक केली.
“हंग्री फॉर कार्गो” हा मंत्र अनुसरत, भारतीय रेल्वेने व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्यासाठी तसेच स्पर्धात्मक दरांमध्ये सेवा वितरण करण्यात सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण आखणीचे पाठबळ असेल्या व्यवसाय विकास केंद्रांचे कार्य यामुळे भारतीय रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यात मदत झाली.