नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण १२ हजार ९३० तडजोड पात्र प्रकरणे पक्षकारांच्या सामंजस्यांने निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये ११ हजार ८२३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व १ हजार १०७ दावा दाखल पूर्व प्रकरणांचा समावेश होता, अशी माहीती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्यामार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व अति. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १३ ऑगस्ट, २०२२ रोजी “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते.
या अदालतींमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयांकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण रक्कम १६७ कोटी ०४ लाख २९ हजार २८३ व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रू. २ कोटी ७१ लाख ७१ हजार ६१४ अशी एकूण रू. १६९ कोटी ७६ लाख ८२७ रुपये एवढ्या रकमेचा समावेश आहे. मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणामध्ये ३३८ प्रकरणांत तडजोड होवुन पिडीतांना रक्कम २५,९८,७७,६३५ रु. एवढी भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण २५१ प्रकरणांमध्ये तडजोड होवुन रू. १७,८९,२१,६३५ रु. एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजुर करण्यात आली आहेत, असे सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
यात विशेष म्हणजे मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य एच.एम. भोसले यांनी एका मोटार अपघात दावा प्रकरणातील मयत सचिन विजय सुर्वे यांची पत्नी रुपाली सचिन सुर्वे यांना बजाज इन्शुरन्स कंपनी आणि गाडीचे मालक यांच्यामध्ये तडजोड करून ५४ लाख रुपये इतकी रक्कम मिळवून दिली आहे. तसेच आणखीन एका मोटार अपघात दावा प्रकरणातील मयत कुलेंद्रकुमार उपेंद्र सहा यांच्या वारस पत्नी कांचनकुमारी कुलेंद्रकुमार सहा, मुलगी साक्षी आणि वडील उपेंद्र सुखदेव सहा यांना या प्रकरणी बजाज इन्शुरन्स कंपनी आणि गाडीचे मालक यांच्यामध्ये तडजोड करून ४६, लाख इतकी रक्कम तडजोडपोटी मिळवून दिली आहे. भोसले यांनी एकूण २३५ मोटार अपघात दावा प्रकरणांत तडजोड घडवून आणण्यात यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्याप्रमाणे मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य एच. एम. भोसले, अति. जिल्हा न्यायाधीश एम.एम. वलीमोहम्मद, कल्याण जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टूरकर, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश ए.एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश-२, पालघर एम. एस. देशपांडे, आणि जिल्हा न्यायाधीश- २ व अति. सत्र न्यायाधीश, वसई एस. व्ही. खोंगल, जिल्हा न्यायाधीश- २ व अति. सत्र न्यायाधीश वसई आर.डी. देशपांडे यांनी मोटार अपघात दावा प्रकरणांमध्ये यशस्वीरीत्या तडजोड घडवून आणून एकूण ३३८ प्रकरणातील कुटुंबियांना दिलासा मिळवून दिला आहे.
तसेच ६वे सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) जे. आर. मुलाणी, ज्यांनी धनादेश परताव्या संबंधीची एकूण ३६ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे लोकअदालतमध्ये निकाली काढली आहेत. त्यामध्ये एक पाच वर्षे जुने प्रकरणामध्ये ८० लाख रुपयांची तडजोड घडवून आणली आहे. तसेच ५वे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) आर. आर. पत्की धनादेश परतावा प्रकरणांची एकूण २३८ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांमध्ये लोकअदालतमध्ये तडजोड घडवून आणलेली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.एन. रुकमे यांनी त्यांच्याकडील एका प्रकरणांत ६७ वर्षांच्या वृध्द वडीलांना एक नाही तर दोन मुलांकडून निर्वाह भत्ता मिळण्यासाठी दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतकरीता गठित पॅनलद्वारे न्याय मिळवून दिला. या प्रकरणातील दोन मुलांनी त्यांच्या वडिलांना प्रत्येकी ४५०० रु. असे एकूण ९ हजार रुपये देण्याबाबत सामंजस्याने समेट घडवून न्याय मिळवून दिला आहे.
एका प्रकरणात पती पत्नी यांच्यातील वादाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मिटवून मनोमिलन करण्यात यश आले.राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात ठाणे जिल्हा द्वितीय प्रलंबित प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये निकाली काढण्यात संपूर्ण राज्यात ठाणे द्वितीय स्थानावर आहे. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करण्यात ठाणे जिल्हा न्यायालयाला यश आले. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रलंबित जुनी प्रकरणे निकाली काढणेकरीता प्राधान्य देण्यात आले होते, असे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले.लोकअदालत दृष्टीक्षेपात· तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणांची संख्या – ४० हजार ३७६. · निकाली प्रकरणे – न्यायालयीन प्रलंबित निकाली प्रकरणे – ११ हजार ८२३. · दावा दाखल पूर्व निकाली प्रकरणे १ हजार १०७.· तडजोड रक्कम – एकशे एकोनसत्तर कोटी शहात्तर लाख आठशे सत्यान्नव (रु.१.६९,७६,००,८९७/-).