नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मध्यप्रदेश/प्रतिनिधी – दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज, मध्यप्रदेशातील श्योपूर इथल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. यावेळी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री , नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित होते.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग पासून 7900 किमी पेक्षा अधिक प्रवास करुन आलेले हे 12 चित्ते आज दुपारी 12 नंतर ग्वाल्हेर मार्गे कुनो राष्ट्रीय उद्यानात पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत, कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी 12 चित्ते सोडून भारताने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे, असे वनमंत्री यादव यांनी, यासंदर्भात केलेल्या ट्वीट मालिकेत म्हटले आहे.दक्षिण आफ्रिकेतून कुनो राष्ट्रीय उद्यानात हे 12 चित्ते आणणे भारतीय हवाई दलाच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले, असे सांगत, यादव यांनी हवाई दलाचे विशेष आभार मानले आहेत.
पर्यावरण परिसंस्थेबाबत झालेल्या चुका कशा सुधारायच्या आणि परिसंस्थेचे सौहार्द कसे टिकवायचे, हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला दाखवले आहे, असे यादव म्हणाले. 12 चित्यांचे भारतात आगमन, हा त्याच प्रवासाचा एक भाग आहे. त्याचसोबत लोकसहभागाचे उदाहरण सांगताना ते म्हणाले की 450 चित्तामित्र, या चित्यांना नव्या वातावरणात जुळवून घेण्यात मदत करत आहेत, असेही ते म्हणाले.
आता कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्यांची संख्या, 20 पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी, सप्टेंबर महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामीबिया इथून आलेले आठ चित्ते या राष्ट्रीय उद्यानात सोडले होते.