डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसी मध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांना एकाच बंगल्यात ११ नाग आढळून आले. पॉज हेल्पलाईन ला गेल्या रविवारी आलेल्या कॉल नुसार 1 मादा कोब्रा आढळून आली होती. तिला निसर्गात सुखरूप पुनर्वसन केले गेले. आणि त्याच बंगल्याचा आवारात काल चक्क ११ कोब्रा म्हणजे नाग वावरताना आढळून आले. पॉजचे स्वयंसेवक ऋषी सुरसे ह्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत एक एक करत नाग पकडायला सुरुवात केली. तासाभरातच सुमारे ११ नागांची पिल्ले बंगल्यात मिळाली. ही सर्व पिल्ले साधारण एक आठवड्याची असून ती पिल्ले एकाच मादी ची असावीत आणि गेल्या आठवड्यात ज्या मादि नागाला पुनरवसीत केले तिनेच ह्यां पिल्लांची अंडी घातली असण्याची शक्यता आहे असे संस्थेचे संचालक निलेश भणगे ह्यांनी सांगितले. एकाच वेळी विषारी नाग आढळून आल्यामुळे एमआयडीसी मधल्या नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती आणि त्यातच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ११ कोब्रा पिल्ले पकडून त्यांना सुखरूप पणे डोंबिवली जवळच्या जंगलात पुनर्वसित केले.
नाग हा एक विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे. पॉज ने गेल्या 21 वर्षात ६०० च्या वर नागांचे पुनर्वसन केले आहे. आठवड्याभरात डोंबिवली मधून १५ विविध सर्पांची सुटका केली असून १ घोरपड देखील पुनर्वसित केले आहे.