नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाने दि. २५ जुलै २०१२ च्या पत्रान्वये दि.१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, दि. ९सप्टेंबर २०२३ रोजी मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी सुरु करण्यात आली असून १४८-विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे प्रांताधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी आसावरी संसारे यांनी डी.ए.व्ही पब्लिक स्कूल, कापूरबावडी, ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा, मानपाडा या व इतर ठिकाणी मतदान केंद्रांची पाहणी केली.
या मतदान केंद्र जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण जास्तीत जास्त १ हजार ५०० मतदारांच्या आधारे करण्यात येणार आहे. मतदान केंद्र असलेल्या इमारती खराब झालेल्या किंवा मोडकळीस आलेल्या नाहीत, याची खात्री करण्यात येत आहे, अशी माहिती तहसिलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी आसावरी संसारे यांनी दिली आहे.
मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण प्रमाणीकरण करणे, दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे इत्यादी, योग्य प्रकारे विभाग / भाग तयार करणे आणि त्यास मान्यता घेणे, नमुना १ ते ८ तयार करणे, ही कामे करावयाची आहेत. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना एका मतदान केंद्रांतर्गत जास्तीत जास्त १ हजार ५०० मतदाराच्या आधारे करणे, मतदान केंद्र असलेल्या ज्या इमारती खराब झालेल्या या मोडकळीस आलेल्या आहेत, अशा मतदान केंद्राची पाहाणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण मतदान केंद्र नियम पुस्तिका २०२० मधील तरतुदीनुसार करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि शेजाऱ्यांना एका भागामध्ये सूचीबद्ध करणे, मतदारयादी आणि मतदार ओळखपत्रातील पत्त्याचे एकसारखेपण राखणे, ही कामेही करण्यात येणार आहेत.
नवीन मतदान केंद्र तयार करताना किंवा शेजारच्या मतदान केंद्रामध्ये विलीन / संलग्न करुन विद्यमान मतदान केंद्रांची पुनर्रचना करताना (अ) कोणत्याही कुटुंबातील सदस्य विभागले जाणार नाहीत आणि कुटुंबातील सदस्य एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी ठेवले जातील, (ब) एकाच इमारतीमध्ये राहणारे मतदार त्याच यादी भागामध्ये नोंदविण्यात यावेत, (क) शक्यतो एकाच रस्त्यावर राहात असलेल्या मतदारांची एकाच यादी भागामध्ये नोंद करण्यात यावी, या बाबींकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.