नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला / प्रतिनिधी – दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्यात कावड व पालखी महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या मार्गावर अकोला ते गांधीग्राम दरम्यान शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी 10 आरोग्य पथके तैनात करण्यात आले असून या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी कामावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहरामध्ये कावड व पालखी महोत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा होतो. यावर्षीचा कावड व पालखी महोत्सव 11 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. या महोत्सवात अकोला शहर व परिसरातील हजारो शिवभक्त सहभागी होतात. गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून कावडीमध्ये जल भरून या कावडी खांद्यावर घेऊन अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतात व तेथे श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला जातो. 2 भरण्यांपासून ते 501 एक भरण्यांपर्यंतच्या मोठमोठ्या कावडी या महोत्सवात सहभागी असतात. सोबत विविध पद्धतीने सजविलेल्या आकर्षक पालख्या सुद्धा या महोत्सवात सहभागी होतात. या कावड व पालखी महोत्सवात हजारो भाविकांचा सहभाग असतो.
10 सप्टेंबरच्या दुपारपासून भाविक गांधीग्रामकडे रवाना होतील. 11 सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. या दरम्यान कावड व पालखी मार्गावर हजारो शिवभक्तांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने 10 व 11 सप्टेंबर रोजी अकोला ते गांधीग्राम या मार्गावर शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दहा पथके तैनात करण्याचे आदेश काढले आहेत. या प्रत्येक पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ॲम्ब्युलन्स चालक यांचा समावेश असणार असून प्रत्येक पथकासोबत एक ॲम्बुलन्स असणार आहे.
प्रत्येक पथकातील वरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांसाठी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांची नियुक्ती या पथकांमध्ये करण्यात आली त्यांना या दोन दिवसात कोणतीही रजा मिळणार नाही. तसेच पथक प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घ्यावे याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आदेश काढले आहेत. यावर्षीच्या पालखी व कावड महोत्सवात हजारो शिवभक्तांना आरोग्य सुविधा व सेवा मिळणार आहेत.