कल्याण-: घरामध्ये पेईंग गेस्ट म्हणून आसरा मिळवून घर मालकाच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या भामट्याला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. कौस्तुभ कुलकर्णी असे या भामट्याचे नाव असून तो मूळचा अहमदनगरचा रहिवासी आहे.कल्याण पश्चिमेतील जोशी कुटुंबियांची प्रवासात या भामट्याशी ओळख झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेत कौस्तुभने आपण बदलापूरला कामाला असून राहण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याची खोटी बतावणी जोशी कुटुंबाला केली. त्यावर विश्वास ठेवून जोशी कुटुंबियांनी साधारणपणे 3 महिन्यांपूर्वी त्याला पेईंग गेस्ट म्हणून आपल्या घरात जागा दिली. आणि तेव्हापासूनच हळूहळू त्यांच्या घरातील दागिने गायब व्हायला सुरुवात झाली. 100 दिवसांच्या कालावधीत या भामट्याने जोशी कुटुंबियांचे चार लाख रुपये किमतीचे तब्बल 11 तोळे दागिने चोरल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली.
दरम्यान आपल्या कपाटातील आपले आणि पत्नीचे दागिने चोरीला गेल्याचे महेश जोशी यांच्या लक्षात आले. त्यासरशी त्यांनी तडक बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानूसार बाजारपेठ पोलिसांनी कौस्तुभ कुलकर्णीची कसून चौकशी करत त्याला पोलीसी खाक्या दाखवला असता त्याने आपणच हे दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच बदलापूर येथील मुथुट फिनकॉर्पमध्ये ते गहाण ठेवल्याचेही त्याने पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी हे सर्व दागिने हस्तगत केले असून कौस्तुभ कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र आहिरे, तपास पथकातील अधिकारी सहाय्यक निरीक्षक सानप, हवालदार पावशे, पोलीस नाईक पोटे, साळवी, शेख, पोलीस कॉन्स्टेबल सांगळे यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक नितीन भोसले करत आहेत.