नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने व संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय, गोवेली येथे ‘रानभाज्यांची पंगत’ अशी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाना तऱ्हेच्या रानभाज्यांची आरास मांडली होती. जसे ओल्या व सुक्या शेवळ्याची भाजी, शेवळ्याचा रस्सा, शेवळ्याची चटणी, सुक्या मोदुऱ्या, कोरलाची भाजी, कोळूची भाजी, आंबट बिंदूकलीची भाजी, कुड्याच्या फुलांची भाजी, अळूची भाजी, अळकुड्यांची भाजी, टाकळा, भोवरा, भोकर, कोराल, शेवगा, आंबाडी, चायवाल आदी वनस्पतींच्या कोवळ्या पानांची भाजी, तसेच विविध भाकरींचे, पापडांचे, लोणच्यांचे, चटण्यांचे व कंदमुळांचे प्रकार इत्यादी नानाविध प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांनी रुचकर पद्धतीने बनविले होते.
या स्पर्धेतील विजेत्यां मुलींमध्ये प्रथम सानिका देवकर, द्वितीय क्रमांक मानसी मगर, तृतीय क्रमांक काजल धुमाळ, उत्तेजनार्थ अंकिता कोर, संजना बोतकुंडले, संचिता मलिक तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक मानस तारमळे, द्वितीय : चेतन वाडगे, तृतीय : क्रिश भोईर यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कोरे उपस्थित होते. तर हॉटेल शेफ डिलाईट, डोंबिवली या हॉटेलचे मालक राहुल चौधरी हे परीक्षक म्हणून लाभले होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन स्नेहा भोंडीवले यांनी केले.